March 23, 2026 2:27 pm

‘पन्नास खोक्यांचे पुरावे तुम्ही द्या, एक खोक्याचे आम्ही देऊ’

संदीप देशपांडे यांचा शिवसेना ठाकरे गटावर पलटवार 
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटावर केलेल्या 50 खोक्यांच्या आरोपाचे पुरावे सादर करावे, आम्ही ठाकरे गटाच्या नगरसेवकांवर केलेल्या एक कोटीच्या आरोपाचे पुरावे त्वरित सादर करू, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला आहे.
चंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान झाला आहे. भाजपला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप देशपांडे यांनी केला होता. या आरोपाचे पुरावे सादर करण्याचे आव्हान ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आले. त्याला देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी काँग्रेसबरोबर राहावे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत होईल, असे पाऊल उचलू नये, अशा स्पष्ट सूचना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसशी संपर्क साधूनही त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष आणि कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्याकडून देण्यात आले आहे.
यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी भाजपाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलेच तोंडसुख घेतले होते. त्यावरून आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाग्युद्ध  सुरू झाले आहे. ‘तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला,’ असे चालणार नसल्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिला आहे.

Leave a Comment