March 23, 2026 2:25 pm

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची थेट मंत्रालयात धाड 

नरहरी झिरवळ यांच्या विभागातील कार्यालय सील 

मुंबई प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी थेट मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात सापळा रचून दोघांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अखत्यारीतील या कार्यालयाला पोलिसांनी सील ठोकले आहे.

लातूरमधील एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. रद्द परवाना नूतनीकरण करण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या मंत्र्यांना असतात. त्यासंदर्भात सुनावणी घेऊन निर्णय घेतले जातात.

मेडिकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने एका नागरिकाकडे लाच मागितली होती. त्याने 50 हजारांची मागणी केली होती. संबंधित दुकानदाराने त्याबाबत पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी खुद्द मंत्रालयातच सापळा रचून राजेंद्र ढेरंग याला तडजोड करून 35 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

ढेरंग याच्यासह कार्यालयातील आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आपण झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यानुसार लाच घेतली, असा दावा त्याने केला आहे. खासगी सचिव हे मंत्री कार्यालयाचे प्रमुख असतात. त्यामुळे नरहरी झिरवाळ हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment