पुणे प्रतिनिधी
एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा बनाव करून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी चैतन्य विनोद शेंडे (वय १८) याने टेलिग्रामवरील तांत्रिक सुविधेचा गैरवापर करून विद्यार्थ्यांना पेपर आधीच मिळाल्याचा भास निर्माण केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने टेलिग्रामवरील “फाइल रिप्लेस” या सुविधेचा वापर करून ही फसवणूक केली. टेलिग्रामवर एकदा पीडीएफ फाइल अपलोड केल्यानंतर ती नंतर बदलता येते. फाइल बदलली तरी मूळ अपलोडची वेळ (टाइमस्टॅम्प) कायम राहते आणि फक्त “एडिटेड” असा उल्लेख दिसतो. याच तांत्रिक बाबीचा फायदा घेत आरोपीने हा बनाव रचला.
चौकशीत आरोपीने सांगितल्याप्रमाणे, परीक्षेच्या आदल्या दिवशी तो टेलिग्राम ग्रुपवर पासवर्ड संरक्षित पीडीएफ फाइल अपलोड करत असे. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये संदेश टाकून तो संबंधित परीक्षेचा प्रश्नपत्रिका ६०० रुपयांत देऊ शकतो, असा दावा करत असे.
जे विद्यार्थी त्याच्याशी संपर्क साधून पैसे पाठवत, त्यांना आरोपी लगेच ब्लॉक करत असे. दरम्यान, परीक्षा झाल्यानंतर तो खरी प्रश्नपत्रिका मिळवून आधी अपलोड केलेल्या पासवर्ड संरक्षित पीडीएफ फाइलच्या जागी ती फाइल बदलत असे.
यामुळे फाइलची मूळ वेळ कायम राहिल्याने संबंधित प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच अपलोड केली होती, असा भास निर्माण होत होता. या पद्धतीने आरोपी विद्यार्थ्यांना पेपर लीक झाल्याचा विश्वास बसवून त्यांची फसवणूक करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, या प्रकारात आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच अशा प्रकारे इतर विद्यार्थ्यांचीही फसवणूक झाली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.





