सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी
पुणे प्रतिनिधी
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात आणि जगभरात अस्थिरता निर्माण झाली असून या परिस्थितीचे देशावर होणारे परिणाम आणि ऊर्जा सुरक्षा या विषयावर संसदेच्या अधिवेशनात तातडीने चर्चा करावी आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन त्या माध्यमातूनही या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्ग काढण्यात यावा, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगभरात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. त्याची झळ थेट सर्वसामान्यांना पोहोचत आहे. हा प्रश्न राजकीय स्वरूपाचा नाही तर देशापुढे उभे राहिलेले आव्हान आहे. मात्र, केंद्र सरकारला या परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. देशात इंधनाचा तुटवडा असल्याची बाब मान्य करायला केंद्र सरकार तयार नाही, असा आरोप सुळे यांनी केला.
ही वेळ राजकारण करण्याची नाही. देश संकटात असताना विरोधक सहकार्य करण्यास तयार आहेत. मात्र, सरकारने वस्तुस्थिती न लपवता संकट असल्याचे मान्य केले पाहिजे. विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे. विरोधक देखील या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारला सहकार्य करतील, अशी ग्वाही देखील सुळे यांनी दिली.
सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, देशभरातील शेतकऱ्यांना कायमच खतांच्या टंचाईला सामोरे जावे लागते. ग्रीन अमोनियासाठी आठ हजार कोटी रुपयांची योजना सरकारने जाहीर केली. नॅनो फर्टीलायझरची योजना जाहीर केली. जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केले. या सर्वांची काय अंमलबजावणी झाली? त्याचे नेमके फलित काय प्राप्त झाले, असे सवाल सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला केले.
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युद्ध परिस्थितीमध्ये युद्धग्रस्त देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेचे मात्र सुप्रिया सुळे यांनी कौतुक करून जयशंकर यांचे आणि परराष्ट्र विभागाचे जाहीर आभार मानले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी आमदार रोहित पवार मोठे कष्ट करत असून त्यांच्या प्रयत्नांना राज्यातीलच नव्हे तर देशभरातील सर्व विरोधकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केली. आम्हाला आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत. केवळ आमच्या कुटुंबावर जी वेळ आली ती यापुढे इतर कोणावरही येऊ नये एवढेच आमचे म्हणणे आहे, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.





