पुणे: प्रतिनिधी
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय वातावरण तापवले आहे. निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी ठाम मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास आपण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आकाश मोरे यांनी आपल्या प्रचाराची पूर्ण तयारी केली असून १० एप्रिल रोजी बारामतीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमात काँग्रेसकडून मोठे शक्तीप्रदर्शन होणार असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रासपचे महादेव जानकर तसेच महाविकास आघाडीतील इतर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
याचबरोबर पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावर मोरे यांनी जोरदार टीका करत ते विधान चुकीचे आणि राजकीय अपरिपक्वतेचे असल्याचे म्हटले.
दुसरीकडे, बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. आकाश मोरे यांच्या या मागणीमुळे बारामतीतील राजकारणाला नवी कलाटणी मिळाल्याचे चित्र दिसत आहे.






