हिंगोली : प्रतिनिधी
रेल्वे पोलीस असल्याचा बनाव करून लोकांकडून, अगदी पोलिसांकडूनही पैसे उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. ही टोळी मध्यप्रदेशातील असून ती अत्यंत चलाख पद्धतीने फसवणूक करत होती.
आरोपी अज्ञात क्रमांकावरून फोन करून स्वतःची ओळख ‘खंडवा रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक’ अशी करून देत. त्यानंतर ते खोट्या रेल्वे अपघाताची माहिती देत आणि संबंधित व्यक्तीला भावनिकरित्या गुंतवून पैसे मागत.
कळमनुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रेमप्रकाश माकोडे यांनाही असा फोन आला होता. एका मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याचे सांगून मृतदेह पाठवण्यासाठी आइस बॉक्ससाठी ५ हजार रुपये मागण्यात आले. माणुसकीच्या भावनेतून त्यांनी त्वरित पैसे पाठवले.
वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनाही असाच फोन आला. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी माहितीची पडताळणी केली असता असा कोणताही अपघात घडलेलाच नसल्याचे उघड झाले आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला.
यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू करून या टोळीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात कारवाई करून अमित कुर्मी, वीरसिंग गौंड आणि भारत कुर्मी या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर सीताराम कुर्मी हा एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत या टोळीने देशभरात अनेकांना अशाच प्रकारे फसवले असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे नागरिकांनी कोणतीही आर्थिक मदत करण्यापूर्वी माहितीची खात्री करूनच व्यवहार करावा, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.







