मुंबई: प्रतिनिधी
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी सुमारे ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासोबत पार्थ पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
ही बैठक जवळपास एक तास चालली. अधिकृतपणे ही सौजन्य भेट असल्याचे सांगितले गेले असले तरी, बारामती पोटनिवडणुकीसाठी महायुतीची रणनीती यावेळी ठरवण्यात आली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कोणते नवे राजकीय समीकरण मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना ठाम पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. पोटनिवडणुकीत भाजप ‘मोठा भाऊ’ म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि विजयासाठी पूर्ण ताकद लावेल, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.
या बैठकीत बारामतीतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. महायुतीची ताकद प्रभावीपणे दाखवण्यावर आणि समन्वयाने निवडणूक लढवण्यावर भर देण्यात आला. याशिवाय, राज्यातील इतर संघटनात्मक मुद्द्यांवर आणि आघाडीतील समन्वयावरही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.







