कोल्हापूर प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला धक्का बसला आहे. पक्षातील महत्त्वाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे.
घाटगे यांचा आज सकाळी ९ वाजता मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात अधिकृत पक्षप्रवेश झाला आहे. हा प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात घाटगे हे सक्रिय राजकारणात असून त्यांनी यापूर्वी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांनी जोरदार लढत दिली होती.
घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी हा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचे परिणाम दिसून येऊ शकतात.







