नवी मुंबई : प्रतिनिधी
मुंबईला पर्याय म्हणून विकसित झालेल्या नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी सिडकोने मोठी पावले उचलली आहेत. निवासी प्रकल्पांबरोबरच खारघरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे वाणिज्य केंद्र उभारण्याची योजना आखण्यात आली असून, यासाठी सिडकोच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात तब्बल ६,७७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
सिडकोने सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार 2026-27 या आर्थिक वर्षात १६,२५० कोटींचे उत्पन्न आणि १६,१५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
गृहनिर्माण क्षेत्रातही सिडकोने आपला वेग कायम ठेवला आहे. ‘सर्वांसाठी घर’ या उद्दिष्टांतर्गत 2026-27 मध्ये १९,३०० घरांची उभारणी केली जाणार आहे. याआधी 2025-26 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या १६,८७६ घरांच्या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने नव्या योजनेत वाढ करण्यात आली आहे.
एकात्मिक पायाभूत सुविधा, शाश्वत नियोजन आणि नागरिक-केंद्रित विकास या धोरणांवर भर देत सिडको नवी मुंबईला देशातील आघाडीच्या आधुनिक शहरांमध्ये स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, बंगले किंवा रो-हाऊससाठी असलेल्या भूखंडांवर उभारलेल्या बहुमजली इमारतींच्या नियमितीकरणासाठी सिडकोने नवी धोरणे जाहीर केली आहेत. या निर्णयामुळे हजारो घरमालकांना मालमत्तेचे कायदेशीर हस्तांतरण, गहाणखत आणि पुनर्विकास प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. नियोजन प्राधिकरणाची परवानगी घेऊन बांधलेल्या इमारतींना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता नियमित मान्यता दिली जाणार असून, त्यामुळे घरमालकांना मालमत्ता विक्री किंवा बँकेत गहाण ठेवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.







