शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा दावा
मुंबई प्रतिनिधी
चंद्रपूरच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस ऐवजी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांवर आणि यासंबंधीचा निर्णय घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शेवटपर्यंत संपर्कात राहून देखील काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा दावा करून ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी ऐनवेळी भाजपा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर तर उपमहापौर पदी शिवसेना ठाकरे गटाचे प्रशांत दानवे यांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे स्थायी समिती अध्यक्ष पद देखील भाजपने ठाकरे गटाला देऊ केले आहे.
चंद्रपूरमध्ये भाजपासोबत जाण्याचा घेण्यात आलेला निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. त्याला पक्ष नेतृत्वाचे समर्थन नाही. स्थानिक नेत्यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी जर हा निर्णय घेतला असेल तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असा इशाराही राऊत यांनी याबाबतीत बोलताना दिला.
चंद्रपुरात भाजपला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले गेल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. राऊत यांनी या आरोपाची खिल्ली उडवली. एक कोटी रुपयाचा आरोप करणारे भाजपा बरोबर नोटा मोजायला गेले होते का? त्यांना या व्यवहारात त्यांचे 20 टक्के कमिशन मिळाले का, असे उपरोधिक सवाल त्यांनी देशपांडे यांचे नाव न घेता केले.
परभणी महापालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिल्याबद्दल राऊत यांनी काँग्रेसचे आभार मानले. त्याचप्रमाणे परभणीत मुस्लिम समाजाचा महापौर केल्याचे ठाम समर्थन राऊत यांनी केले. महापौर पदावर विराजमान झालेले सय्यद इक्बाल हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते दीर्घकाळ शिवसेनेचे काम करत आहेत. तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे केवळ मुस्लिम असल्याने त्यांच्या महापौर पदावर अक्षय घेण्याचे कोणतेही कारण नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
भारतात लोकशाही व्यवस्था आहे. खुद्द भारतीय जनता पक्षाने महान शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांना देशाचे राष्ट्रपती पद दिले होते. अनेक राज्यांमध्ये मुस्लिम राज्यपाल आहेत. देशाचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुस्लिम समाजाचे होऊन गेले आहेत. त्यामुळे परभणीच्या महापौर पदावर इक्बाल यांच्या निवडीकडे बोट दाखवण्याचे कारण नाही, असेही राऊत म्हणाले.





