March 23, 2026 3:48 pm

राज्याच्या काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता 

किमान तापमानात घट, बाष्पयुक्त वाऱ्यांचा परिणाम 

पुणे प्रतिनिधी

राज्याच्या बहुतेक भागात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असल्या तरीही बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून जमिनीवर येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील काही काळात राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुण्यासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पर्जन्यवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे राज्यातील किमान तापमानामध्ये घट होऊ शकते, असेही हवामान शास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

सध्या वातावरणातील गारवा संपुष्टात आला असून विशेषतः दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणव लागला आहे. मात्र, पहाटे थंडी काही प्रमाणात कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे विशेषतः विदर्भ आणि खानदेशात मात्र किमान तापमानात काहीशी घट झाल्याचे मागील काही दिवसात नोंदवले गेले आहे. पुढील काही काळात वातावरणात आणखी काही बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment