April 24, 2026 7:49 pm

अंधश्रद्धेचे वाढते प्रस्थ हे शासनाचे अपयश : काँग्रेसची टीका

पुणे: प्रतिनिधी

राज्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचे वाढते प्रस्थ हे शासनकर्त्यांचे अपयश असून प्रशासनाचा अंकुश कमी झाल्यामुळे अशा प्रवृत्ती बळावत असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

पुणे काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुभाष थोरवे, भोला वांजळे, तात्या शिर्के, आबा जगताप, गणेश मोरे, राजेश सुतार, संजय अभंग, सुभाष जेधे, गणेश शिंदे, उदय लेले, नरेश आवटे आदी उपस्थित होते.

तिवारी म्हणाले की, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात काँग्रेस सरकारने अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा समाजाच्या संरक्षणासाठी लागू केला. मात्र, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि प्रचार अभावी आजही अनेक निरपराध नागरिक, विशेषतः महिला, भोंदूगिरीचे बळी ठरत आहेत.

मानवी वर्तनात तर्कशक्तीचा अभाव राहिल्यास भीती निर्माण होते आणि त्यातून अंधश्रद्धा वाढीस लागते. अशा परिस्थितीत काही भोंदू व्यक्ती निरपराध लोकांचे शोषण करतात. हे दुष्टचक्र थांबवणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, सरकारी यंत्रणेवरील विश्वास कमी झाल्याने लोक समस्यांच्या निराकरणासाठी बुवाबाजीकडे वळतात. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वास्तववादी उपाययोजना यांचा अभाव असल्याने अशा प्रवृत्ती वाढत आहेत. अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा प्रसार आणि जनजागृती करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, काही भोंदू बाबांना राजकीय आश्रय मिळत असल्यामुळे त्यांचे प्रस्थ वाढत असल्याची टीकाही त्यांनी केली. माध्यमांनी उघड केलेल्या प्रकरणांकडेही संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राची ओळख ही प्रगत आणि पुरोगामी विचारांची असून महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विचारवंतांनी समाजात विवेक, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला. भारतीय राज्यघटनेतील कलम ५१(अ) नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन आणि मानवतावाद जपणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.

“समस्या श्रद्धेत नसून अंधश्रद्धेत आहेत,” असे सांगत राज्य सरकारने समाजात वैज्ञानिक विचारसरणी रुजवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी तिवारी यांनी केली.

Leave a Comment