April 10, 2026 3:16 pm

शिवसेना खासदारांच्या फुटीचे वृत्त खोडसाळ आणि बेजबाबदार: संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांवर जोरदार प्रतिक्रिया देत त्या पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं स्पष्ट केलं. शिवसेनेचे लोकसभेतील सर्व ९ खासदार एकत्र असून, आठ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याच्या बातम्या हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं.

राऊत यांनी सांगितलं की, काही माध्यमांमध्ये फिरणाऱ्या कथित यादीत अनेक नावं टाकण्यात आली आहेत, जी पाहून हसू येतं. “अशा प्रकारे कुणाचंही नाव यादीत घालता येतं. उद्या माझं किंवा आदित्य ठाकरे यांचंही नाव टाकतील,” असा टोला त्यांनी लगावला. सध्याच्या राजकीय वातावरणात काही जण मुद्दाम अशा बातम्या पसरवून गोंधळ निर्माण करत आहेत आणि आपण सक्रिय असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. अशा प्रकारची पत्रकारिता चुकीची असून जनतेची दिशाभूल करणारी आहे, असं ते म्हणाले.

याचबरोबर राऊत यांनी विरोधी पक्षातील खासदारांवर होणाऱ्या कथित अन्यायाचा मुद्दाही उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला जातो, मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांना निधीपासून वंचित ठेवलं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “लाखो मतदारांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना विकास निधी नाकारणं हा सामाजिक अन्याय आहे,” असं ते म्हणाले. सरकारकडून होणाऱ्या या भेदभावावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. राष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घ्यायची असेल, तर संकुचित राजकारण सोडून सर्व पक्षांना समान न्याय देण्याची भूमिका त्यांनी घ्यायला हवी, असं राऊत यांनी सुचवलं. “लोकशाहीत विरोधकांनाही समान संधी मिळाली पाहिजे. अन्यथा केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंतच त्यांचं महत्त्व टिकेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Rashifal