सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर फोडले खापर
सोलापूर प्रतिनिधी
बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध का होऊ शकली नाही, हा प्रश्न मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनाच विचारा, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक बिनविरोध न होण्याचे खापर अजित पवार गटाच्या नेत्यांवर फोडले.
पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. महाराष्ट्रातील बळीराजाला सुख शांती समाधान मिळू दे, हेच आपण विठ्ठलाला साकडं घातलं आहे” असं सुळे यांनी सांगितले.
आपण मतदार म्हणून मतदान करायला बारामती ला जाणार आहोत. प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विचारणा झाली तर जाण्याची आपली तयारी आहे. ‘आखिर रिश्ते भी तो मायने रखते है,’ असेही त्या म्हणाल्या. सत्ता पैसा येतो जातो. मात्र सुख, दुःखात कुटुंब आणि माणसंच कामी येतात. त्यामुळे बारामती निवडणुकीत सुनेत्रा वाहिनीच्या मागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट या विरोधकांपैकी मोठ्या पक्षांनी उमेदवार उभा केलेला नाही. काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्धार करून ॲड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. मात्र शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रोहित पवार यांच्या शिष्टाईला यश येऊन काँग्रेसने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. तरीही ही निवडणूक बिनविरोध होऊ शकत नाही. उमेदवारी अर्ज भरलेल्या 30 जणांनी माघार घेतली असली तरी 23 उमेदवार मैदानात आहेत.





