April 24, 2026 5:27 pm

राज्यात उष्णतेचा कहर वाढला; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे प्रतिनिधी :

राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून विदर्भात प्रचंड उकाडा जाणवत आहे. कोकण, मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्ण व दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. उष्ण वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अकोल्यात मागील २४ तासांत सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अमरावतीत तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचले. वाढत्या उकाड्यामुळे वर्धा जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तापमान ४३ ते ४५ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता असल्याने उष्माघाताचा धोका वाढला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, उत्तर भारतातही मागील काही दिवसांत उष्णतेची लाट जाणवत असून सकाळपासूनच तीव्र उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांत उष्णतेची लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली असून याचा परिणाम मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशावर होण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतात वातावरण अंशतः ढगाळ व दमट राहील, तर ईशान्य भारतात पावसामुळे तापमान नियंत्रणात राहणार आहे. तसेच १६ एप्रिल रोजी हिमालयीन भागात कमी तीव्रतेचा पश्चिमी झंझावात सक्रिय होणार असून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या पावसाची व हिमवृष्टीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Leave a Comment