मुंबई : प्रतिनिधी
राज्यात भोंदूगिरीचे प्रकार उघड होत असतानाच मुंबईतही अशाच प्रकाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड पूर्व परिसरात राहणाऱ्या रिदम पांचाळ (वय ३७) या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. उपचार आणि पूजा यांच्या नावाखाली तो अघोरी कृत्ये करत लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे.
माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून तो रविवार आणि गुरुवारी स्वतःच्या अंगात देवी येते असा दावा करून अघोरी विधी करत होता. भूतबाधा काढण्याच्या नावाखाली तो रात्रीपासून सकाळपर्यंत विधी करायचा. विशेष म्हणजे ४ एप्रिल रोजी त्याने महापालिकेच्या बागेत अनेक लोकांसमोर उघडपणे जादूटोण्याचा प्रयोग केल्याचीही माहिती समोर आली आहे.
उपचाराच्या नावाखाली तो नागरिकांकडून बकऱ्याचे कलेजा, स्मशानातील राख, लिंबू, टाचण्या, दारू, सिगारेट तसेच काळे-लाल कापड यांसारखी वस्तू मागवायचा. या वस्तू चौकात ठेवायला सांगून तो लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या ६५ ते ७० स्थानिक नागरिकांनी एकत्र येत दिंडोशी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांनी फोटो आणि व्हिडीओ पुरावे सादर करत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली. तक्रारीनंतर पोलिसांनी रिदम पांचाळला ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान, आरोप फेटाळत त्याने आपण कोणताही जादूटोणा करत नसून फक्त पूजा आणि लोकसेवा करत असल्याचा दावा केला आहे. तसेच यासाठी कोणताही मोबदला घेत नसल्याचेही त्याने सांगितले.

