April 24, 2026 1:23 pm

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर सर्वांनाच आनंद: जय पवार

पुणे प्रतिनिधी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राज्यासाठी योगदान मोठं होतं यासाठी भारतीय जनता पार्टी मधील नेते प्रचार करत असतील तर ही बाब चांगली आहे. उमेदवार सुनेत्रा पवार यांना दोन लाखापेक्षा जास्त लीड मिळेल. सर्वांना वाटत होतं की दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री पदाची ही आशा पूर्ण करू शकल्या तर सर्वांनाच आनंद होईल, असे मत सुनेत्रा अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी मांडले.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत आपण कोणतेही मत व्यक्त करणार नाही. त्याबाबतचा विचार दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेतेच करतील, असेही जय पवार यांनी स्पष्ट केले. सध्या आपले निवडणुकीकडे लक्ष केंद्रित असून आमदार रोहित पवार यांच्या नियोजनानुसार आमचे प्रचाराचे दौरे सुरू आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात मंत्री अदिती तटकरे यांनी अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न सुनेत्रा पवार यांनी पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर या विषयावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील नुकतीच याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वप्न पाहिल्यामुळे प्रयत्नांना गती मिळते, असे पाटील म्हणाले. मात्र त्याचबरोबर, सध्या राज्यात युतीचे सरकार आहे असे सांगत त्यांनी सत्तारूढ महायुतीतील घटक पक्षांच्या संख्याबळाची आकडेवारी देखील मांडली.

Leave a Comment