April 23, 2026 4:43 pm

‘दारावर फडकणाऱ्या भगव्याशी माझे नाते’

शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कामगार सेनेच्या 58 व्या वर्धापनदिनी प्रतिपादन

मुंबई प्रतिनिधी

कामगार हा देशाचा भाग्यविधाता आहे. मात्र, सध्याच्या काळात कामगारांच्या नावाखाली दुकाने उघडून ती मालकांच्या दावणीला बांधली जात आहेत. कामगार संघटना चालवणाऱ्यांना मालकांच्या खिशातील भागीदारी हवी आहे. शिवसेना तब्बल 58 वर्ष कामगार क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र, शिवसेनेने कधीही कामगारांचा विश्वासघात केला नाही. उद्योगांच्या दारावर फडकणाऱ्या भगव्याची माझे नाते आहे, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेनेची कामगार शाखा असलेल्या कामगार सेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी मंदिर येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

सुरुवातीपासून कामगार सेनेचे नेतृत्व करणारे दत्ताजी साळवी यांच्या आठवणींना ठाकरे यांनी उजाळा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन साळवी यांनी नोकरी सोडली आणि ते शिवसेनेत दाखल झाले. त्यांनी स्वतः नोकरी सोडली असली तरी देखील लाखो कामगारांच्या आयुष्याचे त्यांनी सोने केले, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

मतदारसंघ पुनर्रचनेवरून ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारला लोकसंख्येनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे. अर्थातच ज्या राज्यांची लोकसंख्या अधिक त्या राज्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळणार आहे. याचा अर्थ कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम ज्या राज्यांनी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडला त्यांच्यावर हा अन्याय होणार आहे. सत्तेच्या किल्ल्या कायम आपल्या हाती राहव्या, यासाठीच भाजपने मतदारसंघ पुनर्रचनेचा घाट घातला आहे, अशी टीका त्यांनी केली.

राज्यात भोंदू बाबांची प्रकरणे उघडकीला येत आहेत. अमली पदार्थांची सर्रास विक्री होत आहे आणि हे बंगालची निवडणूक जिंकायला निघाले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प. बंगालमधील प्रचार दौऱ्यावर ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता टीका केली. बंगालमध्ये वाघीण एकटीच लढत आहे. तिला विजय पप्त झालाच पाहिजे, अशा भावना त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना व्यक्त केल्या.

देशात आणि राज्यात सध्या अराजकाची परिस्थिती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने खालसा करण्यासाठी सैन्य घुसवले होते. आताचे सत्ताधारी निवडणुका जिंकण्यासाठी सैन्य घुसवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये दोन लाख फौज तैनात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मतदान कोण करणार, असा सवाल ठाकरे यांनी केला. सक्तवसुली संचालनालयाची भीती दाखवली जात आहे. जुन्या आणि खोट्या गुन्ह्यांना उकरून काढून त्रास दिला जात आहे. महाराष्ट्राने यापुढे अशा धाक दडपशाहीला बळी पडता कामा नये. मराठी म्हणून तुम्हाला एकजुटीने उभे राहावे लागेल, असेही ठाकरे म्हणाले.

सत्तेसाठी महिला आरक्षण विधेयक पुढे करणाऱ्या भाजपाने आहे त्या व्यवस्थेत त्वरित महिलांना आरक्षण द्यावे. महिलांचा एवढा पुळका असेल तर अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाला महिला खासदारांना का पाचारण केले नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. आज हे मंदिर उभारणीचे श्रेय घेत आहेत. मात्र, अफजलखानाच्या सारख्या राक्षसाचे पोट फाडणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि प्राण गेला तरी धर्मांतर करणार नाही, असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज झाले नसते तर राम मंदिर उभारता आले असते का, असा सवालही ठाकरे यांनी केला.

Leave a Comment