पुणे: प्रतिनिधी
केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच नव्हे तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते आणि मतदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा शब्द मी सर्वांच्या वतीने देते, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या.
मी महाविकास आघाडीच्या वतीने सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, सगळे सहकारी, पदाधिकारी यांच्या वतीने वहिनींना शब्द देते की, महाविकास आघाडातील प्रत्येक कार्यकर्ता, बारामतीमधील मतदार वहिनींच्या पाठीशी निवडणुकीत ताकदीने उभा राहील, असे सुळे यांनी सांगितले.
बारामती मतदारसंघातील प्रचाराची सांगता दादांच्या अनुपस्थितीत करावी लागेल, यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही. खूप दुःखाच्या वातावरणात प्रचाराची सांगता होत आहे. मागचे दोन अडीच महिने आपल्यासाठी आव्हानात्मक ठरले. जय आणि पार्थ अजून लहान आहेत. तरी त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली आहे. ते दोघेही मोठे दुःख पचवून ही जबाबदारी पार पाडत आहेत ही अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे, असेही सुळे यांनी नमूद केले. सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा बारामतीकरांचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

