April 23, 2026 6:07 pm

‘महिला आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास आपण तयार’

सुप्रिया सुळे यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान

पुणे प्रतिनिधी

लोकसभा व विधानसभेतील महिला आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विनम्रपणे खुली चर्चा करण्यास आपण तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीची वेळ व ठिकाण कळवावे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले. सन 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी अडीच वर्ष का रखडली, असा सवालही त्यांनी केला.

बारामती विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेपूर्वी सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

भारतीय जनता पक्ष महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यास उत्सुक आहे. मात्र पक्षांतर्गत आरक्षण देण्यास त्यांची तयारी असल्याचे दिसत नाही. महिला आरक्षणाबाबत त्यांना एवढा कळवळा असेल तर त्यांनी अधिकाधिक महिलांना निवडणुकांमध्ये उमेदवारी द्यावी. त्यासाठी त्यांना कोणीही अडवलेले नाही, असे नमूद करतानाच सुळे यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये 40 ते 50 टक्के लोकप्रतिनिधी महिला असल्याचे उदाहरण दिले.

महिला आरक्षण विधेयक सन 2023 मध्येच एकमताने मंजूर झाले होते. मग 2024 मध्ये त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवालही सुळे यांनी केला. आता ह महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही. मतदारसंघ पुनर्रचनेचा आग्रह सोडून सरकारने सध्याच्या 543 जागांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे. त्यासाठी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात रात्रभर थांबण्याची आमची तयारी होती. मात्र, मतदारसंघ पुनर्रचनेशिवाय आहे त्या व्यवस्थेत महिलांना आरक्षण देण्याची भाजपची तयारी नाही, असा दावाही सुळे यांनी केला.

अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे दुःख व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित दादा कमालीच्या ऊर्जेने काम करत असत. राज्यभरातील निवडणुकीची कामे पार पाडून शेवटच्या दिवशी बारामतीत प्रचाराची सभा घेत असत. अजूनही ते आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. त्या दुर्दैवी दिवशी विमान पडले आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

Leave a Comment