April 24, 2026 5:13 pm

अजित पवार विमान अपघात प्रकरणात कटाचा आरोप

गुन्हा दाखल करण्याची अमोल मिटकरी यांची मागणी

सांगली : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मिटकरी यांनी VRS एव्हिएशन कंपनी, तिचे मालक व्ही. के. सिंह आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) मधील अधिकाऱ्यांवर थेट आरोप केला आहे.

या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आपण गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, या कंपनीला, तिच्या मालकाला आणि DGCA अधिकाऱ्यांना संरक्षण कोण देत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय भोंदू अशोक खरात आणि व्ही. के. सिंह यांच्यातील संबंध दर्शवणारे फोटो समोर आल्याचा दावाही त्यांनी केला. हे वक्तव्य त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित व्याख्यानात केले.

दरम्यान, अजित पवार यांना न्याय मिळावा यासाठी “जस्टिस फॉर दादा संवाद यात्रा” राज्यभर काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ही यात्रा १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीपासून सुरू होईल. तसेच, राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये यासाठी ठराव मंजूर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment