April 23, 2026 7:43 pm

‘आयपीएलप्रमाणे राजकारणातही लागत आहे बोली’

फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरे यांचा टोला

मुंबई प्रतिनिधी

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्याची बोली जास्त तिकडे खेळाडू जात असतात. सध्याच्या राजकारणात देखील तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. खेळाडूंप्रमाणेच राजकीय नेते देखील ज्या पक्षाकडून अधिक मोठी बोली बोलली जाईल तिकडेच जाताना दिसत आहेत, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे कार्य प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

भांडुप विक्रोळी परिसरातील शिवसैनिकांशी संवाद साधताना ठाकरे बोलत होते. बंगालमध्ये बंगाली, तामिळनाडूमध्ये तामिळी जसे एकवटले आहेत तसेच महाराष्ट्रातील मराठी माणूस हे कुठल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयपीएल स्पर्धेत एखादा खेळाडू एखाद्या संघाकडून खेळतो आणि त्या संघाचे समर्थक त्या खेळाडूला आपला समजून प्रोत्साहन देतात. पुढच्या वेळी बघितले तर तोच खेळाडू भलत्याच संघाकडून खेळताना दिसतो. त्या खेळाडूवर मोठी बोली लागलेली असते. मात्र, त्याचे समर्थन करणारे बुचकळ्यात पडतात. तसेच सध्याच्या राजकारणाचे झाले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

विधान परिषदेतील निरोप समारंभाच्या वेळी देखील उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणाची आयपीएल बरोबर तुलना केली होती. आपल्या भाषणात कविता, शेर आणि उपरोध यांनी रंग भरतानाच राजकारणात ‘इंडियन पॉलिटिकल लीग’ सुरू झाली आहे का, असा खोचक सवाल केला होता.

Leave a Comment