अमित ठाकरे यांचा संतप्त सवाल
पुणे प्रतिनिधी
राज्यात आणि शहरात ड्रग्स येतात कुठून? सगळ्या शहरात ड्रग्स सापडत आहेत, विकले जात आहेत. हे थांबवण्याची ताकद सरकार मध्ये नाहीये का , असे आक्रमक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सरकारला केले. पोलिसांना केवळ 24 तास मोकळेपणाने काम करण्याची संधी दिल्यास राज्यातील गुन्हेगार वठणीवर येथील, असा सल्लाही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
मुंबईसह इतर शहरातील अमली पदार्थांचा सुळसुळाट, नाशिकमधील धर्मांतरण प्रकरण अशा अनेक प्रश्नांवरून ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.
मुंबईसह राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये सर्रास अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. शाळा महाविद्यालयांच्या जवळ अमली पदार्थ विकले जात आहेत. हे अमली पदार्थ येतात कुठून, ते कोणाकडून आणले जातात, या सगळ्याची माहिती राज्य सरकारकडे नाही का, असा सवालही ठाकरे यांनी केला.
प्रशासनाने अमली पदार्थांचे विक्री बाबत कठोर कारवाई करून संबंधितांवर जास्तीत जास्त कडक कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी आम्ही त्यासाठी रस्त्यावर उतरूच. मात्र, या कारवाईसाठी प्रशासनाने पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
पोलिसांना मोकळेपणाने काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास गुन्हेगारीवर निश्चितपणे आळा येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच ठाकरे यांनी आज खरोखरच पोलिसांना आपल्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य आहे का, असा सवाल केला. पोलिसांना मोकळीक देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्था पालनाचे एक कठोर उदाहरण घालून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आमची सत्ता असती तर अशा सर्वांना फासावर चढवले असते. राज्यातील गुन्हेगारांना वठणीवर आणून प्रगतीकडे नेण्यासाठी सत्तेची सूत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडेच असली पाहिजे, असेही ते म्हणाले.
नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणाबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले की, राज्यातील सर्व कंपन्यांचे केवळ आर्थिकच नव्हे तर कार्यपद्धतीचेही शंभर टक्के लेखापरीक्षण होणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण कोणत्या कंपनीत काम करतो, त्या कंपनीत काय चालते, याबद्दल प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
संघटना बांधणीच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात संपर्क अध्यक्ष नेमले आहेत. पुण्याचे संपर्क अध्यक्ष म्हणून अमित ठाकरे यांनी दिलेली ही पहिली भेट आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, आम्ही सगळ्यांना कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटणार आहोत. सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत आम्ही कुठ कमी पडतोय. संघटनेत काही बदल झाले पाहिजेत. सगळा सविस्तर अहवाल तयार करून राज ठाकरे यांना देणार आहोत.25 आणि 26 एप्रिल रोजी ग्रामीण भागात जाणार आहोत. इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांना देखील भेटणार आहोत, असे अमित ठाकरे म्हणाले.

