April 23, 2026 10:42 pm

‘झोपलेले सरकार वेळीच जागे न झाल्यास…’

रोहिणी खडसे यांचा राज्य सरकारला इशारा

मुंबई प्रतिनिधी

अन्न आणि रोजगार हिरावला गेल्यामुळे गुजरातमधून लाखो परप्रांतीय मजूर स्थलांतर करीत आहेत. महाराष्ट्रातील झोपलेले सरकार वेळीच जागे न झाल्यास पुण्या मुंबईसारख्या शहरातही हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिला.

आखाती देशांमध्ये युद्धामुळे आणि होर्मुझ समुद्रधुनीच्या नाकेबंदीमुळे देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरात मधील वस्त्रोद्योग ठप्प झाला आहे. या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना अन्न आणि रोजगार मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पुन्हा आपल्या गावी निघालेल्या मजुरांचे चित्रण समाज माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. याबाबत खडसे यांनी समाज माध्यमात पोस्ट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ही दृश्य काळजावर घाव घालणारी आहेत. गुजरातमधील सूरत रेल्वे स्टेशन येथून मोठ्या संख्येने मजूर आपल्या गावी परत जात आहेत. गॅसच्या टंचाईमुळे त्यांच्या हातून रोजगार आणि अन्न दोन्ही हिरावून घेतले गेले आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि सरकार मात्र झोपेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी आपण मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये हॉटेल, खानावळी बंद होण्याचे चित्र पाहिले होते. गावखेड्यातून शिक्षणासाठी, पोटापाण्यासाठी मोठ्या शहरात आलेल्या मुलांचे हाल होताना पाहिले. सरकारने परिस्थिती सुधारली नाही तर मुंबई, पुणे सारख्या शहरातही अशीच अवस्था होईल. झोपलेले सरकार….जागे व्हा, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment