पुणे: प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर निवडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील विविध गटांकडून आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
या शर्यतीत राजेंद्र जैन, अनिकेत तटकरे, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, उमेश पाटील आणि विक्रम काकडे यांची नावे चर्चेत आहेत. राजेंद्र जैन हे प्रफुल पटेल यांचे समर्थक मानले जातात. अनिकेत तटकरे यांना यापूर्वी विधानपरिषदेचा अनुभव आहे.
दरम्यान, वडगाव शेरी मतदारसंघातून पराभूत झालेले सुनील टिंगरे हेही विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक आहेत. तसेच उमेश पाटील आणि आनंद परांजपे यांनाही पक्षातील निष्ठावंत आणि अनुभवी नेते म्हणून पाहिले जाते.
दुसरीकडे, ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर पुनर्निवड होण्याची शक्यता वाढली आहे. यासंदर्भात मातोश्री येथे महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरल्याचे समजते. तसेच सुप्रिया सुळे यांनीही त्यांना समर्थन दर्शवले आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.





