पक्ष चालवण्यासाठी परिवारातच तिहेरी जबाबदारीचे वाटप
पुणे प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कारभार चालवण्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपले पुत्र पार्थ आणि जय यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुंबई आणि दिल्ली येथील कामांची जबाबदारी पार्थ पवार यांच्यावर तर बारामती आणि पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग या पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जय पवार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्वतः सुनेत्रा पवार या राज्यभर दौरे करून पक्ष विस्ताराची जबाबदारी पार पाडणार आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील काही बड्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा कारभार हाती घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली होती. त्यानंतर अल्पावधीतच सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. त्यानंतर पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. हे करताना पक्षाची सूत्र पवार घराण्याकडेच राहतील याची काळजी त्यांनी घेतल्याचे दिसून येते.
अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ आणि जय पक्षाच्या कामकाजात अधिक कार्यरत झाले आहेत. पार्थ हे सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर गेले आहेत तर जय यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात आपला संपर्क वाढवला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या शक्यता दुरावल्याने सुनेत्रा पवार यांनी पक्ष संघटना बळकट करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे पक्ष आपल्याच हाती रहावा यासाठी पार्थ आणि जय यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.





