बुलढाणा प्रतिनिधी
राज्यात तापमानाचा पारा चढत असताना बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. एप्रिल महिन्यातच ग्रामीण आणि शहरी भागात पाण्याची कमतरता तीव्र झाली असून, नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
जिल्ह्यातील पाच प्रमुख प्रकल्पांमध्ये साठा केवळ ३० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मे-जूनमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या १५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ४८ गावांतील विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
अनेक गावांमध्ये टँकर हेच पाण्याचे एकमेव साधन उरले आहे. एका टँकरसाठी शेकडो नागरिकांची गर्दी होत असून महिला, पुरुष आणि लहान मुलेही तासन्तास पाण्याच्या प्रतीक्षेत उभी राहत आहेत. काही ठिकाणी १० ते १५ दिवसांनीच पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, वाढत्या टंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात तापमान ४२ ते ४३ अंशांपर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे.
मेहकर तालुका सर्वाधिक प्रभावित झाला असून, जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी टंचाई निवारणाचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. मागणी येताच तातडीने टँकर किंवा विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. आगामी काळात पावसाळा उशिरा आल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





