“नाशिकच्या खड्ड्यांवर भुजबळ संतप्त; ‘कारवाई करा, अन्यथा मंत्रिमंडळात मुद्दा मांडणार'”

“नाशिकच्या खड्ड्यांवर भुजबळ संतप्त; ‘कारवाई करा, अन्यथा मंत्रिमंडळात मुद्दा मांडणार’

नाशिक : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यातून होत असलेल्या अपघातांबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील खराब रस्त्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा हा विषय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासमोर मांडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले नव्हते. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरसेवकही या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत, तर महापालिका प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली.

पाऊस कमी झाल्यानंतर तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे, असे सांगत त्यांनी, खड्डे पुन्हा पडले तरी ते पुन्हा भरावेत, पण निष्काळजीपणामुळे नागरिकांचे बळी जाणार नाहीत, याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंसाठी शासन आणि महापालिकेच्या निष्काळजीपणालाच जबाबदार धरत, एका प्रकरणात जशी दहा लाख रुपयांची मदत देण्यात आली, त्याचप्रमाणे इतर मृतांच्या कुटुंबीयांनाही समान आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन करत भुजबळ म्हणाले की, रस्ते, पाणीपुरवठा आणि बांधकाम यांसारख्या नागरी सुविधांची जबाबदारी महापालिकेचीच आहे. जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याऐवजी अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने कामाला लागणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें