पुणे : प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक आणि पुरोगामी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचारवेध साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ परिसरात होणार आहे.
पद्मपाणी फाऊंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांवर विविध वैचारिक सत्रे, परिसंवाद आणि साहित्यिक चर्चांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची माहिती पद्मपाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा निमंत्रक राहुल डंबाळे, सहसंयोजक सतीश वाघमारे, कर्मचारी संघाचे संतोष मदने तसेच संयोजन समितीतील प्रा. वैशाली देठे, सुवर्णा डंबाळे, डॉ. राहुल ससाणे आणि अक्षय कांबळे यांनी दिली. या संमेलनात विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








