कोल्हापूर, २ ऑक्टोबर : देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतरही माजी सैनिक समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. व्यसनमुक्त आणि शिस्तप्रिय तरुण पिढी घडविण्यासह समाजभान असलेले युवक तयार करण्याचे कार्य माजी सैनिक प्रभावीपणे करू शकतात, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
कणेरी मठ येथे शनिवारी होणाऱ्या अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मान्यवरांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाडिक म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी सैनिक मोठा त्याग करतात. त्यांच्या शौर्य आणि बलिदानामुळे देश सुरक्षित राहतो. निवृत्तीनंतरही समाजासाठी काम करण्याची त्यांची क्षमता मोठी आहे. व्यसनमुक्त युवा पिढी घडविणे आणि सुदृढ, सक्षम व शिस्तबद्ध समाज उभारण्यात माजी सैनिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
अग्निवीर योजनेचाही त्यांनी उल्लेख केला. या माध्यमातून केवळ रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत, तर प्रशिक्षण घेतलेली आणि शिस्तबद्ध युवा शक्तीही समाजाला मिळत असल्याचे महाडिक यांनी नमूद केले.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी माजी सैनिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. देशात दीर्घकाळ शांतता आणि स्थैर्य टिकवण्यासाठी सक्षम संरक्षण व्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चार वर्षांची सेवा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठा लाईफ इन्फंट्री आणि छत्रपती घराण्याचे जुने आणि जवळचे संबंध असून सैनिकांच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितले.
निवेदिता माने यांनी पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या कार्याचे कौतुक केले. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी संघटनेतर्फे सुरू असलेले उपक्रम भविष्यातही प्रभावीपणे सुरू राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्य अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देताना माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले.







