मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया रद्द करावी आणि भविष्यातील निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘गर्जना महामोर्चा’नंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारसंख्या वाढवायची आणि त्यातून सत्ता मिळवायची, तर SIRच्या माध्यमातून दोन कोटी मतदार वगळायचे, हे कोणते राजकारण आहे?” महाराष्ट्रात झालेला SIR कोणत्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आपल्या दोन प्रमुख मागण्या असल्याचे सांगताना राज ठाकरे यांनी SIR रद्द करण्याबरोबरच ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास “दूध का दूध आणि पानी का पानी” होईल, असा दावा त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन दिल्लीमध्ये हा मुद्दा मांडण्याचे आवाहन केले. उद्या कोणाचीही सत्ता आली तरी त्याला आपला विरोध नाही; मात्र सत्ता योग्य मार्गाने आणि पारदर्शक पद्धतीने मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत हा मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चाला मोठी गर्दी झाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही मोर्चाला पाठिंबा दिला.
राज ठाकरे यांनी मतदार यादीतील कथित फेरफाराचा मुद्दा उपस्थित करत आपण 2017 पासून ‘मतचोरी’बाबत बोलत असल्याचे सांगितले. या विषयावर आपण काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती, असा दावा त्यांनी केला.
2024च्या निवडणुकीतील महायुतीच्या विजयावरही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रात महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर अपेक्षित जल्लोष दिसला नाही, उलट वातावरणात शांतता होती, असा दावा त्यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत मतदारसंख्येत मोठी वाढ झाल्याचा आरोप करत त्यांनी 40 ते 60 लाख मतदार वाढल्याचे तसेच दोन्ही निवडणुकांमध्ये मिळून सुमारे एक कोटी मतांची वाढ झाल्याचा दावा केला.
दरम्यान, राज ठाकरे यांनी सरकारच्या आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांवरही जोरदार टीका केली. काही मोजक्या उद्योगपतींना जंगल, प्रकल्प आणि बंदरे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळात अनेक उद्योगपती होते; मात्र सध्याच्या सरकारच्या काळात एका उद्योगपतीला विशेष लाभ दिला जात असल्याची टीका त्यांनी केली.
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांसारख्या संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. देशाच्या संस्थात्मक रचनेत बदल करण्याच्या या कथित प्रयत्नांविरोधातच ‘गर्जना महामोर्चा’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.







