मुंबई : “आमचा लढा कोणत्याही एका पक्षाचा, व्यक्तीचा किंवा जात-धर्माचा नाही. हा लढा देशातील जनतेच्या स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे,” असे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईत आयोजित ‘गर्जना मोर्चा’ला संबोधित करताना त्यांनी सरकारला थेट इशाराही दिला.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभाराचा निषेध तसेच लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी केंद्र सरकार तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे यांनी मांडलेल्या मतदारसंख्येच्या आकडेवारीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील कथित वगळण्याच्या प्रक्रियेवर सवाल उपस्थित केला. महाराष्ट्रातील सुमारे दोन कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी देशभरात तब्बल 13 कोटी मतदारांना यादीतून दूर करण्यात आल्याचा आरोप केला.
“महाराष्ट्राच्या लोकसंख्येएवढे मतदार देशाच्या मतदान यादीतून वगळले जात असतील, तर हे आपण मान्य करायचे का?” असा सवाल ठाकरे यांनी केला. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील मतदारांच्या नावांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. बंगालमध्ये वगळण्यात आलेल्या काही मतदारांना पुढील छाननीत पात्र ठरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरही तीव्र आक्षेप घेतला. पूर्वी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठीच्या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश होता. मात्र, सरन्यायाधीशांना या प्रक्रियेतून दूर करून त्यांच्या जागी केंद्रातील मंत्र्याचा समावेश करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत न्यायालयातील प्रकरणाचा निकाल होईपर्यंत निर्णय पुढे ढकलण्याची मागणी केली होती, असेही ठाकरे म्हणाले. मात्र, त्यानंतर ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पक्षपाती पद्धतीने झाल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
“काँग्रेसच्या काळात भाजपसोबत आम्हीही अनेकदा पुढे गेलो. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. संपूर्ण इंडिया आघाडी ‘इंडिया अगेन्स्ट व्होट चोर’ या भूमिकेतून उभी राहिली आहे,” असे ठाकरे म्हणाले.
भाजपला सरकार चालवता येत नसल्याची टीकाही त्यांनी केली. “प्रशासन आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने सरकार चालवत आहात, त्याला शासन नव्हे तर सूड उगवणे म्हणावे लागेल,” असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. ठाण्यातील अलीकडील हत्येच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी “हेच तुमचे हिंदुत्ववादी सरकार आहे का?” असा सवाल केला.
“ज्ञानेश कुमार हे त्यांचे हत्यार आहे. नागरिकांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. संस्थांवर आणि प्रशासनावर तुमचा ताबा असला तरी हे रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत,” असे ठाकरे म्हणाले.
जनतेचा रोष वाढत राहिल्यास सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरणे कठीण होईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.







