NEET पेपरफुटी प्रकरण : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे झुकले मोदी सरकार; काँग्रेस नेत्या दीप्ती चौधरी यांचा दावा

पुणे: प्रतिनिधी

गेल्या १२ वर्षांपासून केंद्रातील भाजपचे मोदी सरकार मनमानी आणि हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत, अखेर विद्यार्थ्यांच्या प्रखर आंदोलनापुढे सरकारला झुकावे लागले, हा लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांनी म्हटले आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला, ही ऐतिहासिक घटना असल्याचेही त्यांनी म्हटले. तरुण विद्यार्थ्यांच्या आंदोलनासोबतच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने संसदेत आणि संसदेबाहेर सातत्याने आवाज उठवला. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अखेर मोदी सरकारला माघार घ्यावी लागली, असा दावा चौधरी यांनी केला.

या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या पालकांचेही आभार मानले. गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारने देशात निर्माण केलेल्या भीतीच्या वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चक्काचूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
‘प्रधान गेले, आता पंतप्रधानही जातील’ अशी भावना जनतेत आणि तरुणांमध्ये निर्माण झाली असून, भीतीचे वातावरण संपले आहे. या यशस्वी आंदोलनातून लोकशाहीचा विजय झाल्याचे स्पष्ट होते, असे दीप्ती चौधरी यांनी नमूद केले.

Leave a Comment

और पढ़ें