दोन लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण
मुंबई : प्रतिनिधी
गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. यंदा सुमारे दोन लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिंदे यांनी संबंधित विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा उत्सव असून, दरवर्षी हजारो गोविंदा मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. या काळात सरावादरम्यान तसेच प्रत्यक्ष उत्सवादरम्यान अनेक गोविंदांना दुखापती होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या उपचारांचा खर्च भागविण्यासाठी व्यापक विमा संरक्षण देणे आवश्यक असल्याचे सरनाईक यांनी आपल्या पत्रात नमूद केले.
यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे एक लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र यंदा ही संख्या वाढवून सुमारे दोन लाख गोविंदांना महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित यंत्रणेला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे गोविंदा मंडळांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे असून, सरकारच्या सकारात्मक प्रतिसादामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव अधिक सुरक्षित वातावरणात पार पडेल, असा विश्वास पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला.









