मुंबई प्रतिनिधी
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी धमक्या दिल्याचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या आरोपाची खिल्ली उडवत म्हटले की, पक्षप्रवेशासाठी विनंती करून नंतर धमक्या देणे हा मोठा विनोद आहे. भाजप संवादावर विश्वास ठेवतो, धमक्यांवर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अभिजीत दिपके यांच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, भाजपमध्ये प्रवेश न केल्यास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
यावर प्रतिक्रिया देताना उपाध्ये म्हणाले की, एखाद्या आंदोलनाचा चेहरा झाल्याने आणि त्याला यश मिळाल्याने सगळ्या विषयांवर बोलण्याचा अधिकार मिळत नाही. शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा यंत्रणेत सुधारणा करणारे विधेयक कालच संसदेत संमत झाले आहे. दिपके यांनी त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करणे अपेक्षित होते, असेही त्यांनी सांगितले.
भाजप नेते राम कदम यांनीही दिपके यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या कुटुंबाकडून केलेला आरोप खोटा असून, हिम्मत असेल तर कोणत्या माध्यमातून आणि कशा प्रकारच्या धमक्या आल्या याची सविस्तर माहिती जाहीर करावी, असे कदम म्हणाले.
दरम्यान, राजधानीत आंदोलन सुरू झाल्यानंतर एका व्हिडिओद्वारे धमकी मिळाल्याचे दिपके यांनी सांगितले होते. त्या व्हिडिओमध्ये भाजपमध्ये प्रवेश न केल्यास आई-वडिलांना लक्ष्य केले जाईल, अशी धमकी दिल्याचे त्यांच्या आईने सांगितले होते.









