मुंबई: प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बँका हेअरकटच्या नावाखाली अडचणी निर्माण करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भारणे यांनी स्पष्ट भूमिका मांडत शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नसल्याचे आश्वासन दिले.
ही योजना तीन टप्प्यांत राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात २२ जुलैला ५५३ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. दुसऱ्या टप्प्यात १६.९६ लाख शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून ही यादी ऑगस्टमध्ये प्रकाशित होणार आहे.
बँकेतील कर्जखात्यात एक थकबाकी दिसते, तर कर्जमाफीच्या यादीत वेगळी रक्कम दाखवली जाते. या फरकाला ‘हेअरकट’ म्हणतात. हे शेतकऱ्यांशी संबंधित नाही. राज्य सरकार आणि बँकांमधील आर्थिक समझोता आहे, ज्यात सरकार किती थकबाकी स्वीकारेल आणि बँका किती माफ करतील, हे ठरते. यामुळे शेतकऱ्यांसाठीची मूळ कर्जमाफीची रक्कम कमी होत नाही. काही बँका याबाबत आग्रह धरत असल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर मंत्र्यांनी सांगितले की, सरकार आणि बँकांमधील करारानुसारच प्रक्रिया पूर्ण होईल.
थकबाकीनुसार सरकार-बँकांचे वाटप असे आहे:
एक वर्षापर्यंत – सरकार ८५%, बँका १५%
दोन वर्षांपर्यंत – सरकार ७०%, बँका ३०%
तीन वर्षांपर्यंत – सरकार ५५%, बँका ४५%
चार वर्षांपर्यंत – सरकार ४५%, बँका ५५%
चार वर्षांनंतर – सरकार ३५%, बँका ६५%
दुसऱ्या यादीत सुमारे १६.९६ लाख खात्यांचा समावेश आहे आणि त्यांना विशिष्ट अनुक्रमांकही देण्यात आले आहेत, असे कृषिमंत्री दत्तात्रय भारणे यांनी सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्याचे आवाहन केले. ऑगस्टअखेर ही प्रक्रिया सुरू राहील. एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी महाआयटी पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे.









