नशामुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांनी हजारो विद्यार्थ्यांना दिली नशामुक्त समाजाची शपथ

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू झालेल्या ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ आज वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी हजारो शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी ड्रग्जमुक्त समाजाची शपथ दिली.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने मुंबई आणि महाराष्ट्रालाही अंमली पदार्थमुक्त करणे आवश्यक आहे. भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा विक्रम अमेरिकेनंतर भारताने केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा इतर आधुनिक तंत्रज्ञान, सर्व क्षेत्रांत भारत वेगाने प्रगती करत आहे.

संरक्षण क्षेत्रातील प्रगतीही थक्क करणारी आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. त्यांनी स्पष्ट केले की, हा जुन्या भारताचा नाही तर नव्या भारताचा काळ आहे. पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याची क्षमता आता सर्वांना कळली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. येथील सर्वाधिक तरुणाई योग्य दिशेने गेली तर भारत जगाचा महागुरू बनू शकतो. शत्रूंनाही हे माहीत आहे. भारताला थेट पराभूत करता येत नाही, म्हणून आता आतून पोकळ करण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे. ज्या तरुणांच्या जोरावर भारत पुढे जाणार आहे, त्याच तरुणांना व्यसनाधीन करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे.

“युद्धातील मुख्य शस्त्र आता अंमली पदार्थ बनले आहे. युवाशक्तीला व्यसनाच्या जाळ्यात अडकवून भविष्यात नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र सुरू आहे. ही लढाई साधी नाही. दुर्दैवाने यात देशातील काही शक्ती पैसे मिळवण्यासाठी सामील झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात सामायिक युद्ध पुकारावे लागेल. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली की, ड्रग्ज वाटप रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करेलच. पण विद्यार्थ्यांनीच ‘नो ड्रग्ज’ असा निर्धार केला तर कोणालाही विक्री किंवा वाटप करण्याची हिंमत होणार नाही. जुहूमध्ये विविध प्रकारे ड्रग्ज तयार होतात, तिथे कारवाई होईल. शाळा-कॉलेजांच्या परिसरात ड्रग्ज विकणाऱ्यांना शोधून जेलमध्ये टाकणे आवश्यक आहे. असे ठाम पाऊल उचलले तर पुढील दोन ते तीन वर्षांत मुंबई नशामुक्त करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

और पढ़ें