मुंबई,: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होणार असल्याच्या चर्चांना जयंत पाटील यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली म्हणून लगेच राजकीय समीकरणे बदलत आहेत, असा निष्कर्ष काढू नये, असे आवाहन त्यांनी माध्यमांना केले.
जिल्हा परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी स्वतः या भेटीचा उद्देश स्पष्ट केला आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात, असा सल्ला पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिला होता. या भेटीत एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत कोणतीही चर्चा झाल्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर जयंत पाटील यांनी आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिल्याचे सांगितले. मुंबईतील आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. तसेच विद्यार्थी आंदोलनाचे नेते अभिजित दिपके यांना केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करत राज्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असेही त्यांनी सुचवले.
राजकीय चर्चांपेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगत, पवार-मोदी भेटीचा चुकीचा अर्थ लावू नये, असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले.








