मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आंदोलनात फेकण्यात आलेल्या दगडांवरील ठसे आधारशी जोडण्याच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी या विधानाची खिल्ली उडवली आणि अशा प्रकारची विधाने शिक्षण मंत्र्यांकडून अपेक्षित नसल्याचे म्हटले.
चंद्रकांत पाटील हे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असल्याने त्यांनी जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या पिढीत सरकारबद्दल नाराजी निर्माण होत असल्याचा टोला लगावला.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह भाषेबाबत व्यक्त केलेल्या नाराजीशी सहमती दर्शवली. कोणाविषयीही अश्लाघ्य किंवा खालच्या पातळीची भाषा वापरली जाऊ नये, असे सांगतानाच हा संदेश भाजपच्या ट्रोल गटांनाही द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण वातावरण वाढल्याचा आरोप करत कलाकार आणि विरोधी विचारांच्या व्यक्तींनाही अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिल्लीतील आंदोलनाचा संदर्भ देताना राज ठाकरे म्हणाले की, हे आंदोलन केवळ नीट परीक्षेच्या पेपरफुटीपुरते मर्यादित नव्हते. शिक्षण पूर्ण केलेले अनेक तरुणही त्यात सहभागी झाले होते. बेरोजगारी आणि असंतोषाचे वातावरण निर्माण होण्यास सरकार आणि सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.








