यापुणे प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेसचे आंदोलन, त्याला भाजपचे प्रत्युत्तर, आगामी मंत्रिमंडळ विस्तार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी राजधानीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी स्पष्टीकरण न दिल्यास अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा इशारा काँग्रेसने यापूर्वीच दिला आहे. ज्याप्रमाणे पुणे सातारा रस्त्यावरील मार्केट यार्ड चौकात काँग्रेसची उग्र निदर्शने सुरू आहेत. अमित शहा यांच्यासमोर गनिमी पद्धतीने निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी काल मध्यरात्रीच युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतली आहे.
काँग्रेसच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी यापूर्वीच दिला होता. त्यानुसार भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेस भवन समोर जमा झाले असून त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
दुसरीकडे दरबारी राजकारणातही अनेक घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. भेटीत झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप स्पष्ट झाला नसला तरीही मंत्रिमंडळ विस्तार आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या मुद्द्यावर ही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.








