मुंबई : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका करत या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबईत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली.
सुळे म्हणाल्या की, देशातील यूपीएससीसारख्या महत्त्वाच्या परीक्षांचा पेपर कधीच फुटत नाही, मग नीटच्या परीक्षेत वारंवार अशा घटना कशा घडतात, याचे उत्तर सरकारने द्यावे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी), सर्वपक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याचा विचार करावा, अशी त्यांनी मागणी केली.
परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाले असले, तरी त्यातून समाधान झालेले नाही, असे सांगत त्यांनी केवळ कठोर शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही, तर पेपरफुटी कायमची थांबवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून परीक्षा व्यवस्थेत हस्तक्षेप होत असेल, तर त्याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने विरोधी पक्षांनाही विश्वासात घ्यावे, असे आवाहन करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवेदनशीलपणे संवाद साधला असता, तर परिस्थिती वेगळी राहिली असती, असे मतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.








