पुणे : जागतिक तापमानवाढीचा परिणाम आता समुद्राच्या तापमानापुरता मर्यादित राहिलेला नसून महासागरातील पाण्याच्या हालचालींवरही होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन डिएगोच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, आगामी शंभर वर्षांत प्रशांत महासागरातील काही भागांमधील खोल पाणी अधिक ‘जुनं’ होण्याची शक्यता आहे.
महासागराचे तापमान वाढल्याने पाण्याच्या विविध थरांमधील नैसर्गिक हालचाल आणि मिश्रण मंदावू शकते. परिणामी काही ठिकाणी खोलवर गेलेले पाणी बराच काळ तिथेच राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, काही भागांमध्ये पाण्याचे नूतनीकरण तुलनेने वेगाने होऊ शकते.
‘पाण्याचे वय’ म्हणजे नेमकं काय?
शास्त्रज्ञांच्या भाषेत पाण्याचे ‘वय’ म्हणजे ते पाणी किती वर्षांपासून अस्तित्वात आहे, असा त्याचा अर्थ नाही. समुद्राच्या पृष्ठभागावरून एखादा पाण्याचा थर पुन्हा खोल समुद्रात गेल्यापासून किती काळ झाला, याला त्याचे वय म्हटले जाते.
पृष्ठभागावर असताना समुद्राचे पाणी वातावरणातून ऑक्सिजन शोषून घेते. हे पाणी खोलवर गेल्यानंतर त्यातील ऑक्सिजनचा वापर सागरी जीव आणि सूक्ष्मजीव करतात. त्यामुळे बराच काळ खोल समुद्रात राहिलेल्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि अशा पाण्याला ‘जुने पाणी’ म्हटले जाते.
महासागराच्या पाण्याचे हे चक्र समुद्री परिसंस्थेसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तापमानवाढीमुळे पाण्याच्या थरांची हालचाल बदलल्यास त्याचा समुद्री जीवसृष्टी, ऑक्सिजनचे वितरण तसेच महासागराच्या उष्णता आणि कार्बन साठवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.








