सामाजिक उपक्रमांसाठी साडेतीन कोटी कृतज्ञता निधी समर्पित
पुणे : भारतीय मजदूर संघाशी संलग्न बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज ऑर्गनायझेशन (बोमरेओ) या संघटनेचे द्वैवार्षिक अधिवेशन पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात नुकतेच पार पडले. देशभरातून सुमारे ७०० प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित होते.
संघटनेचे सरचिटणीस नारायण आचलेरकर यांनी संघटनेच्या २७ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या संघटनेने २०२४ मध्ये रौप्यमहोत्सव साजरा केला. सामाजिक उपक्रमांसाठी संघटनेने आतापर्यंत साडेतीन कोटी रुपयांहून अधिक निधी उभारून समाजासाठी समर्पित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वांचलमधील मुलींना आर्थिक मदत, तळेगाव दाभाडे येथील संजीवनी वसतिगृहातील मुलींना दरवर्षी ड्रेससाठी कापड व शिलाईसाठी मदत तसेच सामाजिक संस्थांना आर्थिक सहाय्य दिले जाते. निवृत्त कृषी अधिकाऱ्यांच्या ‘कृषिमित्र’ उपक्रमातून राजगड तालुक्यातील गुहिणी गावातील शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व मधमाशीपालनासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक मदत केली जाते.
बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक प्रभात किरण यांनी बोमरेओच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. निवृत्त कर्मचाऱ्यांनी घातलेल्या भक्कम पायावर बँकेची वाटचाल सुरू असून, बँकेच्या देशभरात सुमारे २,८०० शाखा आहेत आणि निव्वळ नफा सात हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचे संचालक प्रसेनजीत फडणवीस यांनी निवृत्तीनंतरही स्वतःच्या पेन्शनमधून समाजासाठी योगदान देणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. बदलत्या बँकिंग व्यवस्थेशी निवृत्त कर्मचाऱ्यांनीही जुळवून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, संघटनेचे कार्याध्यक्ष भास्कर माणकेश्वर यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे बँक व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्याची नाराजी व्यक्त केली.
अधिवेशनात पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मोहन घोळवे यांची अध्यक्षपदी, नारायण आचलेरकर यांची कार्याध्यक्षपदी, तर डॉ. सुनील देशपांडे यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या १९ सदस्यांचा संस्थापक बाळासाहेब फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.








