शेतकऱ्याच्या हातात भाजपचे लेटरहेड पाहून शरद पवारांचा मिश्कील सवाल; जवळार्जुनमध्ये हशा

बारामती : दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. रणरणत्या उन्हात शेताच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधत असून त्यांच्या अडचणी, पाणी, चारा, पिके आणि कर्जाच्या प्रश्नांची माहिती घेत आहेत. जवळार्जुन येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना मात्र एका प्रसंगामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

जवळार्जुन येथे शेतकरी आपल्या अडचणी पवारांसमोर मांडत होते. यावेळी एका शेतकऱ्याने पवारांप्रती आपल्या कुटुंबाची निष्ठा व्यक्त करताना वडिलांचा एक किस्सा सांगितला. “माझे वडील मला बारामतीला घेऊन जायचे. ते म्हणायचे, छाती फाडली तरी साहेबच दिसतील,” असे त्या शेतकऱ्याने सांगितले. त्याच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

मात्र, पवारांनी लगेचच त्या शेतकऱ्याने दिलेले निवेदन हातात घेतले. हे निवेदन भाजपच्या लेटरहेडवर असून त्यावर कमळाचे चिन्ह असल्याचे पवारांनी उपस्थितांना दाखवले. त्यानंतर मिश्कीलपणे, “मग हे काय आहे?” असा सवाल त्यांनी केला. पवारांच्या या अनपेक्षित प्रश्नामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारकडे मांडण्याचे आश्वासन पवारांनी दिले. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीसाठी तसेच शेतीशी संबंधित कामांसाठी घेतलेले कर्ज, फळबाग आणि कृषी मोटारींसाठी घेतलेले कर्ज संपूर्णपणे माफ करण्याची मागणी आपण करणार असल्याचे पवार म्हणाले. याशिवाय शेतकऱ्यांची वीजबिले माफ करावीत, दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत आणि मदत व मंजुरीचे अधिकार तालुका पातळीवर द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर पवारांनी भर दिला. त्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांची निवेदनेही स्वीकारण्यात येत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें