गर्जना महामोर्चात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा; ‘राज मुख्यमंत्री, उद्धव पंतप्रधान’चा फलक चर्चेत

मुंबई : निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या ‘गर्जना महामोर्चामुळे’ ठाकरे बंधूंच्या पक्षांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगली आहे. मोर्चात झळकलेल्या एका फलकाने या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

‘राज ठाकरे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे पंतप्रधान’ अशी इच्छा व्यक्त करणारा फलक मोर्चात लक्षवेधी ठरला. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यात राजकीय जवळीक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसैनिक मोहन यादव हेही या मोर्चाच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत. त्यांची भगव्या रंगातील शिवसेना गाडी मोर्चाचे आकर्षण ठरली. यादव यांनीच राज ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करणारा फलक मोर्चात प्रदर्शित केला.

मेट्रो सिनेमा ते महापालिका भवनदरम्यान या महामोर्चाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. मोर्चासाठी राज्याच्या विविध भागांतून शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. विरोधी पक्षांतील अनेक प्रमुख नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, विविध पक्षांचे नेते मोर्चात सहभागी झाले आहेत.

Leave a Comment

और पढ़ें