शेजारील राष्ट्रांच्या भूमिकेमुळे सैन्य दलांवरील जबाबदारी वाढली : काडसिद्धेश्वर महाराज

कोल्हापूर : भारताच्या शेजारील राष्ट्रांचे बदलते धोरण, त्यांची विचारसरणी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदलते समीकरणे पाहता देशाच्या सैन्य दलांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सैन्य दलांवरील जबाबदारीही अधिक वाढली आहे, असे प्रतिपादन कणेरी मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर महाराज यांनी केले.

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाला शनिवारी (३ ऑक्टोबर) कणेरी मठ येथे प्रारंभ झाला. वंदे मातरमच्या गायनानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काडसिद्धेश्वर महाराज यांनी उपस्थित माजी सैनिकांना आशीर्वचन देताना देशाच्या सुरक्षेतील सैन्य दलांची भूमिका अधोरेखित केली.

सीमेवर कार्यरत असताना सैनिक देशासाठी बजावत असलेली जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, निवृत्तीनंतरही समाज आणि राष्ट्रासाठी माजी सैनिकांकडून सुरू असलेली निःस्वार्थ सेवा तितकीच कौतुकास्पद असल्याचे महाराजांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय राजकारण, कूटनीती, भारताची भौगोलिक स्थिती तसेच शेजारील देशांची भूमिका यांचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांकडे लक्ष वेधले. अत्यंत क्लिष्ट विषय सोप्या भाषेत मांडत त्यांनी भारतीय इतिहासातील विविध उदाहरणांचा दाखला दिला. भारताची प्राचीन संस्कृती आणि तिचा व्यापक प्रभावही त्यांनी अधोरेखित केला. इंडोनेशियापासून अफगाणिस्तानपर्यंत तसेच श्रीलंकेपासून तिबेटपर्यंत भारतीय संस्कृतीचा प्रभाव असल्याचे त्यांनी नमूद केले.

या अधिवेशनाला अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल चतुर्वेदी, महाराष्ट्र-गोवा अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीप जोशी, लेफ्टनंट जनरल निंभोरकर, बेळगाव येथील इन्फंट्री स्कूलचे ब्रिगेडियर मराठे, व्हाइस एअर मार्शल नितीन वैद्य, संयोजक कर्नल विलास सुळकुडे आणि अण्णा कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या विविध राज्यांमधून सुमारे ४०० माजी सैनिक प्रतिनिधी अधिवेशनासाठी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सैनिक, वीर जवान तसेच मातृशक्तीचाही अधिवेशनात सहभाग आहे. अधिवेशनाचा समारोप रविवारी (४ ऑक्टोबर) महाराष्ट्राचे सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें