जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेल्या प्रसाद लाड यांना धमक्या

दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रात्रीपासूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आमदार प्रसाद लाड यांना कालपासून धमकीचे दोन ते तीन कॉल आले. हॉटेलमध्ये घुसून मारू अशी धमकी त्यांना देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि दोन तरुणांना अटक केली. आज सकाळीच प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. ते थोड्याच वेळात मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करतील. ही चर्चा झाली तरी देखील उपोषणाच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे जरांगे पाटील यांनी कालच स्पष्ट केले आहे.

प्रसाद लाड यांना धमकी देण्यात आली. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करतो, गाडीवर हल्ला करतो, अशा प्रकारची धमकी दोघांनी दिली. आंदोलन सुरू असताना तुम्ही मनोज जरांगे पाटलांवर टीका करत होते आता कशी भेट घेताय असं म्हणत ही धमकी देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून योगेश शितोळे पाटील व गणेश उगले या दोघांना अटक केली. या दोघांनी धमकी दिल्याचे समोर आले आहे. प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

या संपूर्ण घटनाक्रमावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली. उदय सामंत यांचा जरांगे यांच्याशी चांगला संपर्क असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सरकारची कोणती भूमिका असेल तर अशावेळी उदय सामंत त्यांच्या भेटीला जातात. त्यांच्या भेटीत काही झालं नाही असा माझा अजिबात आरोप नाही, असे ते म्हणाले. तर धमकी प्रकरणावरही त्यांनी मन मोकळं केले. धमकी देणार्‍या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. माझ्याबाबतीत त्यांना काही शंका, त्यांच्या शंकांचं निरसन करु. पोलिसांना त्या तरुणांविरोधात कडक कारवाई न करण्याचे सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मनोज जरांगेंच्या भेटीला त्यांच्या विनंतीनंतर आलो असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment

और पढ़ें