विधानपरिषद निवडणूक लढवण्यासाठी दीपक मानकर इच्छुक

पराभूत झालेल्यांना पुन्हा संधी न देण्याची पक्षाकडे मागणी

पुणे: प्रतिनिधी

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दीपक मानकर यांनी आग्रही दावा केला आहे. यापूर्वी पक्षाने संधी देऊ नाही निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्याऐवजी नव्या उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी ही त्यांनी पक्षाकडे केली आहे.

पुण्यातून विधान परिषदेचे रिक्त होणारी जागा ही मुळात राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मानकर यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांचा या जागेवर दावा आहे. दुसरीकडे पुण्यासह सर्वच स्तरावर वाढलेल्या ताकदीचा विचार करता ही जागा आपल्याला मिळावी, असा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडूनही धरला जात आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना मानकर म्हणाले की, यापूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा, विधान परिषद अशा सर्वच स्तरांवरील निवडणुकांमध्ये महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला सतत पाठिंबा दिला आहे.

त्याचप्रमाणे भाजपने देखील युती धर्माचा विचार करून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावी, अशी आपली मागणी आहे. पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांची देखील तीच भावना असणार आहे आणि त्यासाठी ते भाजपकडे पाठपुरावा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वी पक्षाने ज्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली मात्र, ते पराभूत झाले अशा लोकांचा विचार विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्षाकडून केला जाऊ नये. त्याचप्रमाणे अशा पराभूत उमेदवारांनी देखील कार्यकर्त्यांमधील नाराजी टाळण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवीन उमेदवारांना संधी देण्याचा आग्रह करावा, असेही मानकर म्हणाले.

या निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास त्या संधीचे आपण सोने करून दाखवू. आपला जनसंपर्क केवळ पुणे शहर अथवा जिल्हा पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे आपण या निवडणुकीत निश्चितपणे निवडून येऊ आणि राज्याला आणि पक्ष संघटनेला मजबुती प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने भरीव कामगिरी करून दाखवू, असा दावाही त्यांनी केला.

Leave a Comment

और पढ़ें