साठेबाजी रोखून शेतकऱ्यांना इंधन पुरवठ्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शिर्डी : प्रतिनिधी

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हा प्रशासनांना शेतकऱ्यांसाठी आवश्यक तेवढे डिझेल उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी साठेबाजी करत असेल तर त्यांच्यावर कठोर लक्ष ठेवण्याचे आदेशही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

काही भागांमध्ये डिझेलची मागणी अचानक २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले असून, यामागे कृत्रिम तुटवडा किंवा साठेबाजी असण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांना इंधन मिळावे यासाठी काही जिल्ह्यांमध्ये आरसी बुक तपासून डिझेल देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

वाशिम, हिंगोली, परभणी आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी नागरिकांना रात्रभर रांगा लावाव्या लागत आहेत. काही ठिकाणी इंधनासाठी वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत.

पावसाळा तोंडावर आला असताना पेरणीसह शेतीच्या विविध कामांसाठी डिझेल अत्यावश्यक आहे. मात्र इंधन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत असून शेतीकामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, डिझेल टंचाईचा फटका वाहतूक व्यवसायालाही बसत आहे. ट्रान्सपोर्ट संघटनांनी डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याची तक्रार केली असून अनेक ठिकाणी अत्यल्प प्रमाणात इंधन दिले जात असल्याचे सांगितले. परराज्यात जाणारी वाहने डिझेलअभावी अडकून पडत असल्याने मालवाहतुकीवरही मोठा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया संघटनांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

और पढ़ें