पक्ष एकसंध असल्याचा संदेश राज्यात पोहोचवा: सुनेत्रा पवार 

बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तरे देण्याच्या पक्षनेत्यांना सूचना 

मुंबई: प्रतिनिधी

पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकाच भूमिकेतून आपले म्हणणे मांडावे. पक्ष एकसंध असल्याचा संदेश कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत पोचवावा आणि पक्षफुटीसारख्या वावड्या पसरवून बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्यावे, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.

पक्षांतर्गत सत्तासंघर्ष आणि नाराजीवरून अजित पवार गट मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत पार पडली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपस्थितांना पक्षाच्या एकसंधतेबाबत निर्माण. झालेली साशंकता दूर करण्याच्या सूचना दिल्या.

विरोधी पक्षाचे, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांकडून पक्षफुटीवरून अफवा पसरवून पक्षाची बदनामी केली जात असून त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन पक्षाबद्दलची गोंधळाची स्थिती दूर करण्याची आवश्यकता सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदावरून निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीबाबत स्पष्टीकरण देताना सुनेत्रा पवार यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता सारवासारवीच केली. कोणाचाही स्पष्ट नामोल्लेख न करता, पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यस्तरावर माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंकी, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ व अनिल पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

निवडणूक यादी पुनरीक्षण प्रक्रिये दरम्यान पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली जाऊ नयेत यासाठी सतर्क राहण्याचे आदेश सुनेत्रा पवार यांनी दिले. बूथ प्रतिनिधी, बूथ पदाधिकारी यांनी एकत्रितपणे पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये सक्रियतेने सहभागी होऊन या प्रक्रियेचा वापर पक्ष संघटना बुधपासून गाव, शहर, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपापल्या मतदारसंघात या विषयावर यापूर्वीच काम सुरू केले असून त्यांनी राज्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

और पढ़ें